होय, मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारीः मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना टोला

0
47
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प आपल्या अहंकारापोटी कांजूरमार्गला हलवला, असा आरोप करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जोरदार टोला लगावला. होय, मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने चर्चेतून कांजूरमार्ग जागेचा वाद सोडवला पाहिजे. तुम्ही या आणि चर्चा करा, हवे तर श्रेय तुम्ही घ्या, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे श्रेय देण्याची तयारी दाखवली. आरे कारशेड मेट्रो ३ साठी होता. तेथे ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेवर घनदाट जंगल होते. उर्वरित २५ हेक्टर जागा कमी पडणार होती. त्यानंतर जंगल मारत मारत आपल्याला जागा वाढवावी लागली असती. मेट्रोसाठी आपल्याला स्टेबलिंग लाइनची गरज आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेबलिंग लाइनचा प्रस्तावच नव्हता, हे पाहून मला धक्का बसला. म्हणून कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कांजूरमार्गची जागा ४० हेक्टर आहे. ही जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रो ३, ४ आणि ६ या मार्किंगच्या कारशेड करता येणार आहेत. आरेतील मेट्रो कारशेड ५ वर्षांसाठीच वापरता येणार होते. कांजूरमार्गचे कारशेड पुढील ४० वर्षे वापरता येणार आहे. केंद्र सरकार कांजूरमार्गच्या जागेसाठी न्यायालयात गेले. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे. हा वाद सोडवला नाही तर ती जागा बिल्डरच्या घशात जाईल. उद्या आम्ही असो की तुम्ही, पण ती जागा जनतेची आहे. विरोधकांनी हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचे श्रेय द्यायला तयार आहे. कारण हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा