धमकी देऊ नका, एक थापड अशी देऊ की पुन्हा उठणारही नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

0
190
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू, असे वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली असतानाच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही संताप आज अनावर झाल्याचे पहायला मिळाले. थापडा घेत आणि देत शिवसेना इथवर आली आहे. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा दामदुपटीने दिल्या आहेत. याही पुढे देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नका. एकच थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी येथील जांबोरी मैदानावर झाला.त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत शिवसेना इथवर आली आहे. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा दामदुपटीने दिल्या आहेत. याही पुढे देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नका. एकच थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा लढवय्या गुण आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये  सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर  मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

चाळीतील कष्टकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यः बीडीडी चाळीचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णन केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील  कष्टकऱ्यांचा  मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे. आपण कितीही मजली इमारत आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवाः संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या  हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते.या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृतीची नाळ तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्यांना जन्माला घातले आहे, त्याच ठिकाणी आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय असेही ठाकरे म्हणाले.

ग्रामीण भागात लाख घरेः गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच होते, मी त्यांच्याकडे लहानपणी जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

कष्टाचा ठेवा विकू नका- शरद पवारः ज्येष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार म्हणाले, बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते.अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकत्रितपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास  आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही  दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासात श्रमिकांचा वाटा-बाळासाहेब थोरातः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अनेक विकासाचे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमाफी या शासनाने दिली. समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. तसेच मुंबईतील कोस्टल रोड, स्कायवॉक, मोनोरेल ही कामही वेगाने सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे त्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या असून या पुनर्विकास प्रकल्पातील अडथळे त्यामुळे दूर झाले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या विकासात श्रमिकांचा वाटा मोठा आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे व मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही.

३६ महिन्यात काम पूर्ण करणार-डॉ.जितेंद्र आव्हाडः गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अनेक क्रांतिकारक, साहित्यिकांसह रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटूही या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्याला होते. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. करारनामा,विस्थापितांचे प्रश्न अशी अशी अनेक आव्हाने होती. परंतु त्यातून मार्ग काढला. पुढील ३६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुमारे तीन हजार पोलिसांना घरे देण्याचे प्रस्तावित असून येथील निवृत्त पोलीस तसेच 2010 पूर्वीपासून ज्यांचे वास्तव्य आहे अशा पोलिसांनाही घरे देण्याचे नियोजन आहे.कामाठीपुरा व कुलाबा येथील झोपडपट्टीचाही समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड,अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक,वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख,  पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील पाटील,  मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर,खा. अरविंद सावंत,खा.राहुल शेवाळे,आ. सदा सरवणकर, आ.अजय चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, माजी मंत्री सचिन अहिर,माजी आ.सुनील शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा