अजितदादांच्या मनातले ओळखण्यासाठी ‘इंगित विद्या’ शिकणारः मुख्यमंत्री ठाकरेंची टोलेबाजी

0
858
संग्रहित छायाचित्र.

पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात काय चाललेय हे ओळखण्यासाठी मी ‘इंगित विद्याशास्त्र’ शिकणार आहे. ही भाषा शिकल्यानंतर त्यांनी गॉगल घातला, मास्क लावला तरी त्यांच्या मनातील ओळखणार, अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साधेपणाने परंतु अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याला उपस्थित निवडक शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही टोलेबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना त्यांच्या भाषाज्ञानाचा उल्लेख केला होता. अजितदादांना डोळ्यांची भाषा ओळखता येते, असेही बेनके म्हणाले होते. तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यात ‘इंगित विद्याशास्त्र’ ही एक भाषा होती. या भाषेमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे ओळखता येते. अजितदादांच्या मनात काय चालले आहे, हे ओळखता आले पाहिजे, त्यासाठी मी आता ती भाषा शिकणार आहे. मग त्यांनी गॉगल घातला, मास्क लावला तरी त्यांच्या मनातील ओळखणार, असे ठाकरे म्हणाले. त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

काही गोष्टी अशा असतात की त्याला भाषेची गरज नसते. एखादी गोष्ट करायची ठरवली की बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या एका जिद्दीने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मी असेन, दादा असतील किंवा संभाजीराजे असतील. राजे तुम्ही कितीही म्हणा राजकारण बाजूला ठेवा. पण तुमच्या आमच्या मनातील शिवप्रेम हा महत्वाचा धागा आहे. धागे अनेक असतात, पण गोफ विणणे महत्वाचे असते. हा राज्याच्या विकासाचा गोफ असणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजयंतीच हवी असे नाही. त्यांचे स्थान आपल्या मनात, ह्रदयात आहे. कुठल्याही कामासाठी निघताना नकळत त्यांच स्मरण होते. कारण ते आपल्या धमन्यांत, रक्तामध्ये आहेत. अनेक किल्ले मी हेलिकॉप्टरमधून पाहिले आहेत. ते आता जगापर्यंत पोहोचवायचे आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवप्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरवू, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, अमोल कोल्हे, अतुल बेनके, विनायक मेटे, मराठा सेवासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा