जनतेच्या जीवाची पर्वा नसेल तर तो राजकारणात राहूच कसा शकतो?: ठाकरेंचा फडणवीसांना टोला

0
60

मुंबईः शेवटी राजकारणालासुद्धा एक सीमा असते. प्राथमिकता काय आहे तर जनता. त्या जनतेचे आयुष्य, आरोग्य याचे जर का भान तुम्हाला नसेल तर तुम्ही राज्यकर्ते किंवा राजकारणी कसले? जर कुणाला जनतेच्या जिवाची पर्वा नसेल तर तो राजकारणात राहूच कसा शकतो?, असा जोरदार टोला लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या राजकीय हेतूवरच आसूड ओढले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ घेतली. त्या मुलाखतीत ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा फैलाव होत असताना कोरोनासाठीची नियमावली मोडून मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘जर कुणाला जनतेच्या जिवाची पर्वा नसेल तर तो राजकारणात राहूच कसा शकतो?’ असा सवाल करत त्याने राजकारणात राहू नये. कारण अशा लोकांच्या हातात जर का पुन्हा महाराष्ट्र गेला तर महाराष्ट्राचे काय होईल सांगता येत नाही, असे म्हटले आहे.

 सरकार पडेल म्हणणारांचे दात पडलेः हे सरकार एक वर्ष पूर्ण करतंय. हे सरकार अकरा दिवसही चालणार नाही, त्यानंतर हे सरकार तीन महिन्यांत पडेल, हे सरकार आता आपल्याच ओझ्याने पडेल अशी अनेक ज्योतिषं आणि भाकिते वर्तवण्यात आली, असे संजय राऊत यांनी विचारले असता असे बोलणारांचे दात पडत आले, असा टोला लगवात मुख्यमंत्री म्हणाले की, हे तिन्ही पक्ष एकत्र येणारच नाहीत, असे काही जणांना वाटत होते. शिवसेना आपल्या मागे फरफटतच येईल. शिवसेनेला आपल्याच मागे यावे लागेल, त्याशिवाय ती काहीच करू शकत नाही, असा ज्यांचा समज होता, तो आपण फोल ठरवला, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांच्या डोक्यावरील उपचारांची प्रक्रिया सुरू आहे. डोक्यावर उपचार म्हणजे फक्त चंपी मालिश करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदींना टोलाः…तर तुमची त्या खुर्चीत बसण्याची लायकी नाही- हे राज्य नीट चालू नये अशा प्रकारची धोरणे आणि भूमिका केंद्राकडून घेतली जात आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, ठीक आहे कोणी आज पंतप्रधान असेल. उद्या दुसरा असेल. कुणी आज मुख्यमंत्री आहे. उद्या दुसरा असेल. पण आपण मुळात इथे का बसलो आहे. इकडे पक्षभेद विसरून तुम्हा काम करणे अपेक्षित आहे. तुम्ही शपथ घेता ना…सर्वांना समान न्याय तुम्ही दिला पाहिजे. तो जर न देता तुम्ही त्याच्यात पक्षपात करत असाल तर मात्र तुम्ही त्या खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा