मंदिरे उघडा म्हणायला तुमचे काय जाते?: मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतले भाजपला फैलावर!

0
100
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मंदिराच्या विषयावर मी हळूवार जातोय. काही जण म्हणतात, तुम्ही हे उघडलं, ते उघडलं नाही. मंदिरे उघडा सांगायला तुमचे काय जाते? जबाबदारी तुमच्यावर नाही, आमच्यावर आहे. त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. उगाच तंगडयात तंगड घालून, गोष्टी बंद ठेवण्याची आमची मानसिकता नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला फैलावर घेतले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे. उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, करोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नाही. सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही याचा पुनरुच्चार करतांना मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असे आवाहनही केले.

त्रिसूत्रीचे पालन कराः मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करा, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना काळजी घ्या, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मास्क हाच आपला ब्लॅक बेल्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतील नो मास्क नो एंट्री सारख्या नाविन्यपूर्ण कल्पनेचाही यावेळी उल्लेख केला.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड होणार कांजूरमार्गलाः पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. ही जागा शून्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे. शासनाचा एकही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही. आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा