‘संभाजीनगर’ वादावर मुख्यमंत्री म्हणालेः सेक्युलर हा आघाडीचा अजेंडा, औरंगजेब सेक्युलर नव्हताच!

0
382
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद आणि नामांतराला सत्ताधारी काँग्रेसने केलेला विरोध अशा कोंडित अडकलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.  संभाजीनगर असा उल्‍लेख आम्‍ही वर्षानुवर्षे करतच आहोत. आम्ही वर्षानुवर्षे तेच केले आहे. तेच करणार आणि स्वीकारणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील संभाजीनगरच बोलायचे. त्‍यात मी नवीन काहीच केले नाही. औरंगजेब कधीच सेक्युलर नव्हता. महाविकास आघाडीच्या अजेंड्यात सेक्‍युलर हा शब्‍द आहे, पण औरंगजेब त्‍यात बसत नाही, असे ठाकरे म्हणाले.

नाशिकमधील वसंत गिते आणि सुनील बागुल या नेत्‍यांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्‍यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्‍थानी सायंकाळी भेट घेतली. त्‍यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गेल्‍या काही दिवसांपासून औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा तापला आहे. राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती देताना संभाजीनगर असा अधिकृत उल्‍लेख करण्यात आला आहे. त्‍यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्‍त केली होती.

शहरांची नावे बदलून लोकांच्या जीवनमानात काही फरक पडतो का असा सवाल करताना शहरांच्या नामांतराला काँग्रेसचा विरोधच राहील असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता, त्‍यात नवीन काय केले? संभाजीनगर असा उल्‍लेख आम्‍ही पहिल्‍यापासूनच करतो. औरंगजेब हा काही सेक्‍युलर नव्हता. त्यामुळे आघाडीच्या अजेंड्यात सेक्‍युलर हा जो शब्‍द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्‍हणाले.

बाळासाहेब थोरातांचे उत्तरः नामांतराला विरोध कायम- मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचेही आराध्य दैवत असून श्रद्धास्थान आहे. नामांतरामुळे जे राजकारण होत आहे, माणसे दुरावली जात आहेत, ते होऊ नये म्हणून काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित पटवून देऊ. आमची भूमिका कायम आहे. नामांतराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम केला असून त्याप्रमाणेच काम करत आहोत. कुठे मतभेद झाले तर चर्चा करू, असे थोरात म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा