राम मंदिराचे ई-भूमिपूजन करू शकत नाही का?: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सवाल

2
189
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राम मंदिराच्या मुद्याला एका लढ्याची पार्श्वभूमी आहे. आज आपल्याकडे कोरोनाचे संकट असताना सर्व मंदिरांत जाण्या- येण्याला बंदी आहे. मी अयोध्येत जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छित असतील,त्यांचे तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? असे अनेक सवाल उपस्थित करतानाच हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार. अशावेळी तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करू शकत नाही का?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. या भागात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राम मंदिराच्या प्रश्नावर सविस्तर भाष्य केले.

हेही वाचाः सरकार पाडायचे तर जरूर पाडा, फोडाफोडी करून बघाः मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान

राममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?, या संजय राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, नुसतं ‘हो’ किंवा ‘नाही’ असं उत्तर द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काही उत्तर देऊ शकेन, पण आपण जसं म्हणालात की, राममंदिराच्या लढय़ात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला राममंदिरात गेलो. किंबहुना योगायोगावर माझी श्रद्धा आहे. माझी भावना हेच सांगते की, नोव्हेंबर १८ मध्ये पहिल्यांदा मी राममंदिरात गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मूठ माती मी घेऊन गेलो, त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड पडला होता. कोणी काही विषयच काढत नव्हता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा, पण राममंदिर बनवा, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचाः इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात नेमकी कशी लावली कात्री, जाणून घ्या सविस्तर तपशील

राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं. त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराचं आंदोलन चाललं होतं तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. अशा लाखो, करोडो लोकांच्या भावना निगडित आहेत, असेही ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा