यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त?, मुख्यमंत्र्यांची आज टास्क फोर्ससोबत बैठक; निर्बंध शिथिलतेवर चर्चा

0
147
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना टास्क फोर्सची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला टास्क फोर्समधील वरिष्ठ डॉक्टर आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधात आणखी शिथिलता देण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून लागू असलेल्या कोरोना निर्बंधामुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. सणासुदीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथील करण्याची मागणी व्यापारी, दुकाने, उपाहारगृह चालकांकडून केली जात आहे. सध्या सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे,मॉल्स रात्री १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. उपाहारगृहांमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेशाची मुभा आहे. उपाहारगृहांना रात्री १० वाजेपर्यंतचीच मुभा असल्याने रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्यांचे हाल होतात. त्यामुळे उपाहारगृहे आणि बार मालकांकडून वेळेची मर्यादा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

राज्यातील कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. मागील वर्षी ऐनदिवाळीत लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा कमी झालेला कोरोना संसर्ग पाहता निर्बंधांत शिथिलता द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर दुकाने, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारकडून येत्या एक- दोन दिवसांत सुधारित अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे.

 याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्सची महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत निर्बंध शिथिलतेबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त साजरी करता येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा