औरंगाबादच्या १ हजार ६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे शनिवारी मुख्यमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

0
139
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या महत्वाकांक्षी १ हजार ६८० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन शनिवार, १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थिती राहणार आहेत.

औरंगाबाद शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून पाईपलाइन टाकली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने १हजार ६८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोरोनामुळे या कामांचे उद्घाटन रखडले होते. परंतु आता त्याला गती मिळणार आहे. शनिवार, १२ डिसेंबर रोजी गरवारे स्टेडियम परिसरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. याबरोबरच शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

१ हजार ६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिकेच्यावतीने ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेमुळे शहरातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. औरंगाबाद शहरात नव्याने समाविष्ठ झालेल्या सातारा-देवळाई परिसराला या योजनेचा लाभ मिळणार आहे. २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख होणार असून त्यावेळच्या लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे याव्दारे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. शहरातील कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही.

दरम्यान, या योजनेचे खासगीकरण होणार नाही, नागरिकांवर कुठल्याही प्रकारे अतिरिक्त बोजा पडणार नसून वाजवी दरात नागरिकांना पाणी मिळणार आहे. पाणी पुरवठा योजनेसोबत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान तसेच जंगल सफारी पार्क व रस्त्याच्या कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. विविध विकास कामांच्या अनुषंगाने या शहराचे सुपर औरंगाबाद व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, शहरवासियांचे जीवन अधिक सुखकर करणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

पाणी पुरवठा योजनेची वैशिष्ट्येः

  • या प्रकल्पाची एकूण किंमत १६८०.५० कोटी इतकी आहे. हा प्रकल्प जायकवाडी धरण उद्भवावरुन मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंतराज्यात राबवलेल्या प्रकल्पांपैकी हा एक सर्वात मोठा पाणीपुरवठा प्रकल्प आहे.
  • तूर्तास ही योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून मंजूर करण्यात आली आहे.भविष्यात केंद्र शासनाची नवीन योजना मंजूर झाल्यानंतर या योजनेला केंद्र शासनाच्या नवीन योजनेंतर्गत अर्थसहाय्य पुरवण्यात येणार आहे.
  • ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असूनत्याचे कार्यन्वयन पूर्णपणेजीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व औरंगाबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त प्रकल्प व्यवस्थापन युनिट स्थापन करण्यात आले आहे.या योजनेच्या कामाचे आदेश मे. जी.व्ही.पी. आर. इंजिनिअर्स, हैदरबाद कंत्राटदारास देण्यात आले आहेत.
  • औरंगाबाद शहराची सध्याची अंदाजित लोकसंख्या १५ लक्ष असून २०५२ मध्ये सुमारे ३३ लक्ष होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने या योजनेची संकल्पना करण्यात आली आहे.
  • शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसरासह संपूर्ण शहराची गरज या योजनेत विचारात घेण्यात आली आहे.शहराची खूप दिवसांपासूनची पाणीपुरवठ्याची गरज या योजनेद्वारे पूर्ण होणार आहे.
  • या योजनेमध्ये प्रामुख्याने जायकवाडी धरणावर उद्भव विहीर (Jack Well) व पंपगृह,३९२ एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र,शहर व सातारा देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी एकूण ५३ जलकुंभ (४९ उंच पाण्याच्या टाक्या व ४ जमिनीवरील पाण्याच्या टाक्या), सुमारे ४० कि.मी. अशुध्द पाण्याची पाईपलाईन, ८४ कि.मी. पाणी वाहून नेणारी पाईपलाईन व १९११ कि.मी. वितरण व्यवस्था, सुमारे ९०,००० घरगुती नळजोडण्या विस्थापित करणे स्टाफ क्वॉर्टर, पंपिंग मशिनरी ,एक्सप्रेस फिडर हे घटक समाविष्ट आहेत.
  • या योजनेतील जलशुध्दीकरण केंद्र हे नक्षत्रवाडी येथे उभारण्यात येणार आहे. त्याबाबतची जमीन देखील महानगरपालिकेच्या नावावर आहे. सदर योजना पूर्ण होण्यास अंदाजे ३ वर्षाचा कालावधी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा