नावे ठरली, विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ जणांची यादी सोमवारी राज्यपालांकडे सोपवणार

0
3391
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त करावयाच्या प्रत्येकी चार जणांची यादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपविली असून, शिवसेनेसह १२ जणांच्या नावाची यादी  सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शुक्रवारी रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य व अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे समजते.

विधानपरिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त रिक्त जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसनेनेकडून प्रत्येकी चार जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. त्यानुसार ही नावे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संबंध पाहता निकषात बसतील अशांच्या नावांना पसंती देण्याचे धोरण तिन्ही पक्षांनी अवलंबले असल्याचे सांगण्यात येते.

या १२ रिक्त जागांवर कोणाकोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक तर्क लावले जात असतानाच नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य व अतिवृष्टीग्रस्तांच्या तसेच वाढीव वीजबीलांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे समजते. राज्यपाल नियुक्त सदस्य हा कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्राशी निगडित असावा असा नियम आहे. महाविकास आघाडीकडून देण्यात येणारी नावे या निकषात बसतात का किंवा या नावांवर राज्यपालांकडून कोणतीही हरकत घेतली जाऊ नये, यासाठी तिन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

उर्मिला मातोंडकरांची आमदारकी फिक्स?: सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यपाल निकषांची फुटपट्टी लावणार हे तिन्ही पक्षांनी गृहित धरले आहे. त्यामुळेच शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मातोंडकर यांनी होकार दिला असल्याने उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून आमदार होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, शिवसेतून अजून कोणाला संधी देणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. तिन्ही पक्षांतील या १२ नावांची यादी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली जाणार आहे.

शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांच्या नावाचीही चर्चाः शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यात आता आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे. उर्मिला यांच्या उमेदवारीमुळे भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप नेहमीच शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला तोडीस तोड म्हणून शिवसेनेकडून शरद पोंक्षे हे नाव दिले जाणार अशी चर्चा आहे. मात्र, आपणास अदयाप विचारणा झाली नसल्याची माहिती शरद पोंक्षे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा