हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

0
181
संग्रहित छायाचित्र.

जळगावः आमचे सरकार मजबूत आहे. आम्ही एकत्रच आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आमचे सरकार पाडूनच दाखवा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहेत.

विभिन्न विचारसरणीचे असलेले तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले महाविकास आघाडीचे सरकार फारकाळ टिकणार नाही, अशी विधाने भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. त्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. मुक्ताईनगर येथे आयोजित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच एकत्र आलो आहोत. विभिन्न विचारसरणी असलेल्या तीन पक्षांचे सरकार फारकाळ टिकणार नाही. आम्ही लवकरच सत्तेत येऊ, असे भाजप नेते सांगत सुटले आहेत. पण आम्ही एकत्र आहोत. आमचे सरकार मजबूत आहे. एप्रिलनंतर भाजप ऑपरेशन लोटस मोहीम हाती घेणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हालाच बाजूला लोटले आहे. त्यामुळे या मोहिमेचा काही उपयोग होणार नाही. राज्यातील जनता तुम्हाला पुन्हा दूर लोटल्याशिवाय राहणार नाही. हिंमत असेल तर उद्याच कशाच आज नाही तर आत्ताच सरकार पाडूनच दाखवा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. गेली तीन वर्षे आम्ही ज्या भाजपबरोबर राहिलो, त्यांनी आमच्यावर कधीही विश्‍वास दाखवला नाही. आम्ही काही त्यांचे गुलाम नव्हतो. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर विश्‍वास दाखवला. सत्ता स्थापनेपूर्वी झालेल्या एकाच राजकीय बैठकीत आमच्या विचारांमध्ये एकमत झाले, असेही ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा