औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतरावर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच शिक्कामोर्तब?

0
710

मुंबईः वादग्रस्त मुद्दे बाजूला सारून समन्वयाने सरकार चालवण्याच्या मुद्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले खरे परंतु आज खुद्द मुख्यमंत्री कार्यालयानेच औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केल्यामुळे आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर झाले पाहिजे, ही शिवसेनेची जुनीच मागणी आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनच ही मागणी लावून धरण्यात आली होती. युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यातही आले होते. मात्र कोर्टकज्जात ते टिकले नव्हते. तेव्हापासून औरंगाबाद की संभाजीनगर असा वाद सुरू असतानाच आज मुख्यमंत्री कार्यालयानेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केला आहे तर औरंगाबाद हे अधिकृत नाव मात्र कंसात नमूद केले आहे.

औरंगाबादजवळील करमाड ते बदनापूर दरम्यान सटाणा शिवारात आज पहाटे मालगाडीने १६ स्थलांतरित मजुरांना चिरडले. त्याबाबतची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आणि निर्णय जाहीर करण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केला आहे आणि औरंगाबाद हे अधिकृत नाव मात्र कंसात  टाकले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रू. ५ लाख मदत जाहीर केली आहे,’ असे मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणे हा हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा असल्याची टिका करत धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी या नामांतराला कायमच विरोध केला आहे. त्यात सध्या शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसचाही समावेश आहे. अशावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करणे महाराष्ट्र विकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पाडण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटाविरुद्ध एकजुटीने लढा दिला जात असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाने ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करून औरंगाबादच्या नामांतराच्या जुन्या वादाला फोडणी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

करमाड रेल्वे अपघातातील जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा