औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’नंतर सीएमओवर उस्मानाबादचे झाले ‘धाराशिव’!

0
146
छायाचित्रः ट्विटरवरून साभार

मुंबईः औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) अधिकृत ट्विटर हँडलवर आता उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा नसून किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालणार आहे, असे सांगत काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आल्यानंतर सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीही सीएमओच्या ट्विटर हँडलवर पुन्हा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करण्यात आला. त्यात आता उस्मानाबादच्या नामांतराची भर पडली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली. त्यात उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही माहिती देताना जी स्लाइड वापरण्यात आली आहे, त्या स्लाइडवर काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांचे छायाचित्र आहे.

शहरांच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करून पुन्हा डिवचण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस आता नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यातील शहरांची नामांतरे हा महाविकास आघाडीत वादाचा मुद्दा ठरण्याचीही शक्यता आहे.

विशेष म्हणजे औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख झाल्यावर विरोध काँग्रेसने विरोध केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख आहे आणि औरंगजेब हा कधीच धर्मनिरपेक्ष नव्हता, असा युक्तिवाद करत औरंगाबादच्या संभाजीनगरचे समर्थन केले होते. आता उस्मानाबादच्या धाराशिवचे कसे समर्थन केले जाते, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा