५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना प्रत्यक्ष वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी

0
153
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्व धारण सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन आता ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी असल्याचे आदेश सहकार विभागाने जारी केले आहेत.

५० पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे. संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व ऑनलाईन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस,मेल, व्हॉटस्अॅपद्वारे कळवण्यात यावे, असेही सहकार विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डवर, संस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावी. तसेच ज्या सभासदांचे ईमेल, पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणा-या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राद्वारे पोहोच करावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवून, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात यावी, असेही सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

वर्तमानपत्रातील जाहिरातीत या बाबींचा समावेश आवश्यकः

  • वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हीसी किवा ओएव्हीएम (Other Audio Visual Means) यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार आहे.
  • सभेचा दिनांक व वेळ.
  • ज्या सभासदांनी आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती संबंधित सहकारी संस्थेकडे नोंद केली नसेल त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी याबाबतचा तपशील नमूद करावा.

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हीसी किंवा ओएव्हीएम (Other Audio Visual Means) द्वारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असणा-या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. तसेच एजन्सीची निवड करताना मराठी सॉफ्टवेअर वापरणाऱ्या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेस सदस्यांच्या उपस्थितीबाबत योग्य नोंद ठेवून सभेबाबतचे अभिलेख प्रचलीत तरतूदीनुसार जतन करावे. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे सहकार विभागाने जारी केलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा