सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, वार्षिक सभेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुभा

0
122
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि जवळपास ६५ हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठीही ३१ डिसेंबरपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, बाजार समित्या, सहकारी दूध संघ, अशा अ वर्गातील ११६ मोठ्या सहकारी संस्था, नागरी सहकारी बँका, पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था अशा ब वर्गातील  मध्यम स्वरूपाच्या १३ हजार ८५, छोट्या पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा क वर्गातील १३ हजार ७४, कामगार संस्था, ग्राहक संस्था अशा ड वर्गातील २१ हजार सहकारी संस्था अशा एकूण ४५ हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे  राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याचे दिसू लागल्यावर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील बंदी उठवण्याचा निर्णय ३१ जानेवारी रोजी घेतला होता. मात्र त्यानंतर या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागल्यामुळे  राज्यभर कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंत स्थगीत करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.

सहकार कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षणानंतर संबंधित सहकारी संस्थेने सप्टेंबरअखेरपर्यंत वार्षिक सर्वसाधारणसभा घेऊन लेखापरीक्षण अहवालाला मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक सहकारी संस्थांचे अद्यापही लेखापरीक्षण झालेले नाही. त्यामुळे लेखापरीक्षणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून वार्षिक सर्वसाधारणसभा घेण्यासाठीही ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा