शिवसेनेत शीतयुद्धः मीच मोठा नेता, आ. दानवेंपेक्षा माझीच लेव्हल वरची; चंद्रकांत खैरेंचा दावा

0
179
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊ घातलेल्या असतानाच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या शिवसेनेते माजी खासदार चंद्रकांत खैरेविरुद्ध आमदार अंबादास दानवे अशी धुसपुस नेहमीचीच झालेली असताना आता खैरे यांनी शिवसेनेत मीच मोठा नेता असून अंबादास दानवे माझी बरोबरी करूच शकत नाहीत. त्यांच्यापेक्षा माझीच लेव्हल मोठी आहे, असा दावा केल्यामुळे हा वाद नव्याने उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवसंवाद आणि शिवतेज मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेवरूनही शिवसेनेते गटातटाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यातच बुधवारी संत एकनाथ रंगमंदिरात पत्रकारांशी बोलताना माजी खासदार खैरे यांनी मीच मोठा नेता असल्याचा दावा करून या गटातटाच्या राजकारणाला नव्याने फोडणी दिली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेत जातीय वादाचे राजकारण मूळ धरत आहे. आ. दानवे आणि खैरे असे गट पडले आहेत काय? असे विचारले असता खैरे म्हणाले, माझी आणि दानवेंची लेव्हल एक नाही. पक्षातील १३ नेत्यांपैकी मी एक आहे. पक्ष घटनेनुसार ते पद आहे. नेते, उपनेते, संपर्क नेते आणि नंतर जिल्हाप्रमुख असा क्रम आहे. त्यामुळे दानवे आणि माझी बरोबरी असण्याचा प्रश्नच येत नाही, असे खैरे म्हणाले.

 अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही खैरे यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. परंतु आता त्यांनी सत्तारांशी हातमिळवणी केल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार आणि तुमचे सूर जुळले आहेत, यामागे नेमके कारण काय? असे विचारले असता खैरे म्हणाले, सत्तार आता हिरवे राहिलेले नाहीत. ते भगवे झाले आहेत. त्यांनी त्यांचे कार्यालयही भगवे केले आहे. पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर जादू केली आहे. त्यामुळे ते भगवे झाले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असेल, असे खैरे म्हणाले.

हेही वाचाः न्यूजटाऊनचा दणकाः चिश्तिया महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांच्या नियमित मान्यतांना स्थगिती!

शहरात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीत राज्यमंत्री सत्तार आणि मी मोटबांधणी करणार आहे, असे खैरे म्हणाले. महापालिका निवडणुकीत संमिश्र वातावरण असले तरी शिवसेनेला किमान ५५ जागा मिळतील, असा दावाही खैरे यांनी यावेळी केला.

त्यांची पायरी मोठी, माझी लहान- दानवेः खैरे यांच्या दाव्यावर आमदार अंबादास दानवे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे नेतेच आहेत आणि राहतील. त्यांची पायरी मोठी आहे. माझी पायरी लहान आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा