मोदींची थेट शिवरायांशी तुलना: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून देशभर संतापाची लाट!

3
392
छायाचित्रः जयभगवान गोयल यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे आज दिल्लीतील भाजप कार्यालयात आयोजित धार्मिक- सांस्कृतिक संमेलनात प्रकाशन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या ज्वाज्वल्य अभिमानाचे प्रतिक असलेल्या शिवाजी महाराजांशीच नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा प्रमाद या पुस्तकाच्या रुपाने झाला असल्यामुळे देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशी तुलना करून छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी, या मागणीने जोर धरला आहे.

युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी, दिल्ली प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जयभगवान गोयल यांनीच फेसबुक आणि ट्विटरवर या पुस्तक प्रकाशनाची छायाचित्रे शेअर केली आहेत.

आज भाजपा दिल्ली प्रदेश कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि…

Posted by Jai Bhagwan Goyal – जय भगवान गोयल on Saturday, 11 January 2020

मोदींची थेट शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत असून मोदी यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. आज के शिवाजी नरेंद्र मोदी, पटत नाही मनाला, अशी खोचक टीका गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज तर सोडाच पण एखाद्या मावळ्या इतकेसुद्धा पराक्रमी नाहीत. रयतेची महाराजांनी जी काळजी घेतली ती आत्ममग्न मोदींच्या गावीही नाही. मीदींना महाराजांची उपमा देऊन भाजपने रयतेच्या राजाचा- महाराजांचा नि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ स्तंभलेखक, पत्रकार राजू परूळेकर यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले गुण लोकांपुढे  ठेवण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र घेणार आहे का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी विचारला आहे.

3 प्रतिक्रिया

  1. अरे थोड़ी तरी लाज बाळगा आपन कुणाची तुलना कुनाशी करतो याच भांन ठेवा त्या लेखकावर कार्यवाही झाली पाहीजे ही जेम्स लेन ला चूकीची माहिती पुरवनाराची ही अवलाद आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा