पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याला सशर्त परवानगी, वारकऱ्यांकडे लस घेतल्याचा पुरावा अनिवार्य

0
23
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्यास सशर्त परवानगी देण्यात आली असून दिंडीतील वारकऱ्यांकडे लस घेतल्याचा पुरावा आणि ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास ६०० दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह कोरोना लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, असे आवाहन चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडीप्रमुख आणि भाविकांना केली आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नाथ षष्ठी सोहळ्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही चव्हाण म्हणाले.

 नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी चव्हाण यांनी हे आवाहन केले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाथषष्ठीनिमित्त २० ते २५ मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये २० व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार करावी.  याशिवाय १० व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

पैठणमध्ये भाविक दाखल होण्यास सुरूवात होत असल्याने पाटबंधारे विभागाने २० ते २५ मार्च या कालावधीत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात करावी. पोलिस यंत्रणांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा. महावितरणने लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक त्याठिकाणी जनित्रांची व्यवस्था करावी. नगर पालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर द्यावा. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पथके तयार ठेवावी.  आरोग्य यंत्रणांनी मुबलक औषध साठ्यांसह आरोग्य पथके नेमावीत, अशा सूचनाही चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना  दिल्या.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे,  निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार डी.बी. निलावाड, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, नाथ वंशज रघुनाथबुवा गोसावी, योगेश गोसावी, मधुसुदन रंगनाथबुवा, छैय्या महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी,  विनित गोसावी, श्रेयस गोसावी,  नगर पालिका मुख्याधिकारी संतोष आगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सु.सो. शेळके, डॉ.पी.एम. कुलकर्णी आदींसह सर्व यंत्रणांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा