‘शिवसेनेला मतांची चिंता म्हणून औरंगाबादच्या नामांतराचा ‘सामना’, हा ढोंगीपणाच नाही काय?’

0
242
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची आणि या मुद्यावरूनच सत्ताधारी महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेला मतांची चिंता वाटते, म्हणूनच औरंगाबादच्या नामांतराचा ‘सामना’ सुरू आहे. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते. तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल करत काँग्रेसने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांवर पलटवार केला आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

हेही वाचाः औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा निर्णय एकमतानेच होईलः आदित्य ठाकरे

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळे त्यांनीही नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्येच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची गरज नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असेही थोरात यांनी ठणकावले आहे.

महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल, या भ्रमात कोणीही राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनवले आहे. हे सरकार बनवताना आम्ही एकमताने किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, असे थोरात यांनी भाजपला ठणकावले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा