आझाद की गुलाम?: आझादांच्या ‘पद्मभूषण’वरून काँग्रेस नेत्यांत दोन तट, नव्या महाभारताची नांदी?

0
173
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांना मोदी सरकारकडून मंगळवारी जाहीर झालेल्या पद्मभूषण पुरस्कारावरून काँग्रेस नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आझादांना जाहीर झाल्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. भाजपकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा झालेला हा सन्मान काही काँग्रेस नेत्यांना रूचलेला नाही तर काँग्रेसमधीलच काही ज्येष्ठ नेत्यांनी आझादांचे खुलेपणाने अभिनंदन केले आहे. आझादांच्या पद्मभूषणवरून काँग्रेस नेत्यांत पडलेले हे दोन तट नव्या महाभारताची नांदी मानण्यात येत आहे.

मोदी सरकारकडून गुलामनबी आझाद यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांमधील दुफळी दिसू लागली आहे. काँग्रेसमधील एक गट आझाद यांना जाहीर झालेल्या पद्मभूषणबाबत टिकेचा सूर आळवत आहे तर काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी२३ गटातील नेत्यांनी मात्र आझाद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसमधील जी-२३ गटातील नेते माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी आझाद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा संसदीय लोकशाही आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाचा सन्मान आहे, अशा शब्दांत शर्मा यांनी आझादांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे दुसरे एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आझादांच्या पुरस्काराच्या निमित्ताने काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. गुलामनबी आझाद यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. अभिनंदन भाईजान! देश तुमचे योगदान स्वीकारत असताना काँग्रेसला मात्र तुमच्या सेवेची गरज उरलेली नाही, हे हास्यास्पद आहे, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राज बब्बर यांनीही आझाद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे निष्कलंक सार्वजनिक जीवन आणि गांधीवादी आदर्शांप्रती असलेली बांधिलकी आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. पद्मभूषण सन्मान हा तुमच्या पाच दशकाच्या आदर्श सेवेचा यथोचित सन्मान आहे, असे राज बब्बर यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही आझादांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एकीकडे अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे आणखी एक काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मात्र आझाद यांच्यावर अप्रत्यक्ष टिकास्त्र सोडले आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी त्यांना जाहीर झालेला पद्मभूषण नाकारला आहे. त्यांच्या या निर्णयाचा आझादांशी संबंध जोडत ‘बुद्धदेव भट्टाचार्य यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांना ‘आझाद’ रहायचे आहे, ‘गुलाम’ नाही,’ अशा शब्दांत रमेश यांनी टोमणा मारला आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून आझाद यांच्या पुरस्काराबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू झालेली ही शाब्दिक चकमक काँग्रेसमधील नव्या महाभारताची नांदी मानली जाऊ लागली आहे. गुलामनबी आझाद काँग्रेस सोडून जम्मू-काश्मीरमध्ये आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करून शकतात, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. आझाद यांनी या बातम्यांचे खंडणही केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा