‘संभाजीनगर’वरून महाधुसफूसः सीएमओच्या ट्विटर अकाऊंटवरील उल्लेखाने काँग्रेस संतापली

0
151
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकारण पेटलेले असतानाच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीमध्येच आता धुसफूस सुरू झाली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात आलेल्या या अगोचरपणावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे आणि भान बाळगण्याचा सल्लाही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या @CMOMaharashtra या ट्विटर अकांऊटवरून देण्यात आली. ही माहिती देत असतानाच ‘संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता’ अशी एक स्लाइड टाकण्यात आली. विशेष म्हणजे या स्लाइडवर औरंगाबादच्या नामांतराला विरोध असलेल्या काँग्रेसचेच नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे छायाचित्रही आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून हे ट्विटर अकाऊंट चालवले जाते.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यामुळे लगेच वाद निर्माण झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत लगेच आपली नाराजी व्यक्त केली आणि ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही,’ अशा शब्दांत त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला सुनावले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून रहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये. आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा