ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना प्रजासत्ताक दिनासाठी दिलेले निमंत्रण रद्द कराः चव्हाणांची मागणी

0
88
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणुमुळे जगभरात खळबळ माजली असून अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातलेली असतानाच ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करा आणि तिकडून भारतात येणाऱ्या विमानांवरही बंदी घाला, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. या कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग आधीच्या विषाणूच्या ७० टक्क्यांनी जास्त आहे, एवढा हा विषाणू घातक आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये रविवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचाः ब्रिटनमध्ये आढळला पहिल्यापेक्षा ७० टक्के जास्त वेगाने फैलावणारा कोरोना विषाणू, जगभर खळबळ

भारतीय जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणे योग्य ठरणार नाही. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा लोकांचे आरोग्य आणि जीव धोक्यात न घालण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करणे आवश्यक असते, त्या करायच्या असतात, असा सल्लाही चव्हाण यांनी प्रधानमंत्री मोदींना दिला आहे. मागच्या वेळी प्रधानमंत्री मोदी यांनी लॉकडाऊन लावण्यास विलंब केला म्हणूनच महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव झाला, अशी टीकाही चव्हाण यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा