बहुचर्चित हनी ट्रॅप रॅकेटशी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा संबंध : दिग्विजय सिंहांचा आरोप

0
352

इंदूर : सध्या देशभर गाजत असलेल्या मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटशी महाराष्ट्राचे कामगार, भूकंप पुनर्वसन मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचाही संबंध जोडून ज्येष्ठ काँग्रेस नेते  दिग्विजय सिंह यांनी खळबळ उडवून दिली आहे. दिग्विजय सिंहांच्या या आरोपानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे लातूर जिल्ह्यातील नेते अभय साळुंके यांनी इंदूरचे पलासिया पोलिस ठाणे गाठून हनी ट्रॅप प्रकरणात निलंगेकरांचीही चौकशी करून या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शनही शोधून काढण्याची मागणी केली आहे.

बडे राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना मोहपाशात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या हनी ट्रॅप रॅकेटची मुख्यसूत्रधार श्वेता विजय जैन हिला इंदूर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींशी संबंधित हे रॅकेट असल्यामुळे त्यावरून राजकारणही तापू लागले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या रॅकेटचा संबंध थेट भाजपशी जोडत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जेव्हा जितू जिराती मध्यप्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष होते, तेव्हा हनी ट्रॅप रॅकेटची मुख्यसूत्रधार श्वेता जैन महामंत्री होती की नव्हती? श्वेता जैन भारतीय जनता युवा मोर्चात सक्रिय होती आणि तेव्हा संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपयुमोचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते की नव्हते? हेच निलंगेकर सध्या महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत की नाहीत? श्वेता जैन हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हा ती महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीसोबत रहात होती? याचा शोध मीडियाने घेतला पाहिजे, असे सांगत दिग्विजय सिंह यांनी या हनी ट्रॅप रॅकेटशी थेट निलंगेकरांचा संबंध जोडला आहे.

दिग्विजय सिंहांच्या या आरोपांनंतर लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे काँग्रेस नेते अभय साळुंके यांनी इंदूर गाठले. इंदूरच्या ज्या पलासिया पोलिस ठाण्यात हनी ट्रॅप रॅकेटचा गुन्हा दाखल झाला, तेथे जाऊन त्यांनी हनी ट्रॅप प्रकरणात मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचीही चौकशीची आणि या रॅकेटचे महाराष्ट्र कनेक्शन शोधून काढण्याची मागणी केली आहे. निलंगेकर यांचे इंदूर, भोपाळ, सागरला नेहमी येणे-जाणे होते आणि हनी ट्रॅप रॅकेटची मुख्यसूत्रधार श्वेता जैनचेही मुंबईला येणे-जाणे होते, असे साळुंके यांनी इंदूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. हनी ट्रॅप रॅकेटच्या मोहपाशाचे जाळे मध्यप्रदेशसह पाच राज्यांत पसरले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हनी ट्रॅप रॅकेटची मुख्यसूत्रधार श्वेता जैन इंदूरच्या पॉश वसाहतीत भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदाराच्या घरी किरायाने राहात होती. एकेकाळी भाजप कार्यालयात तिची खूपच उठबस होती. भाजपकडून सागर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी श्वेता जैनला उमेदवारी देण्याचाही विचार सुरू होता. मात्र निवडणुकीपूर्वीच तिचा एसएमएस बाहेर आला आणि तिचे तिकिट कापण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे हनी ट्रॅप रॅकेट?

 बडे राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून मोहपाशात अडकवून नंतर ब्लॅकमेल करत कोट्यवधी रुपये उकळण्यात आले आहेत. या प्रकरणी मध्यप्रदेशातील इंदूर पोलिसांनी श्वेता विजय जैन, श्वेता स्वप्निल जैन, बरखा सोनी, आरती दयाल या चार महिलांसह मोनिका यादव या विद्यार्थीनीस अटक केली आहे. एटीएस व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांनी सुमारे 20 बड्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले आणि हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सुमारे 15 कोटी रुपये वसूल केले. कोणाकडून 50 लाख रुपये तर कोणाकडून 3 कोटी रुपये उकळण्यात आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल आणि 8 सिमकार्डमध्ये 4000 आक्षेपार्ह व्हिडीओ, सेक्स चॅट आढळून आले आहेत. त्यापैकी बहुतांश व्हिडीओ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे आहेत. या महिलांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून मोठमोठी कंत्राटे मिळवून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

लिपस्टिक कव्हर, गॉगलमधील कॅमेऱ्याने चालायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनी ट्रॅप रॅकेटमध्ये सहभागी महिला लिपस्टिक कव्हर आणि गॉगलमध्ये लपवून ठेवायच्या आणि अतिमहत्वाच्या लोकांसोबतची शय्यासोबत रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करत होत्या. मध्यप्रदेश सरकारने या हनी ट्रॅप रॅकेटच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची ( एसआयटी) स्थापन केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा