आर्थिक मदतीबाबत फडणवीसांचा दावा ही निव्वळ हातचलाखीः काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

0
119

कराडः महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा असून उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्राला कर्ज किती आणि रोख रक्कम किती दिली याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी सादर करावी, असे आव्हान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.

मोदी सरकारच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या आर्थिक मदतीची यादीच सादर केली होती. मात्र फडणवीसांच्या या दाव्यावर महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी आक्षेप घेत हे दावे खोडून काढले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही फडणवीसांच्या दाव्यातील फोलपणा उघड केला आहे.

मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे आहेत उर्वरित पॅकेज हे कर्जाच्या स्वरूपातील आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये येऊ शकतात, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपी) ५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाईल आणि ती रक्कम जवळपास १ लाख ६० हजार कोटी रुपये आहे, असा दावा फडणवीसांनी केला होता. ही दिशाभूल असून राज्यांना आधीपासूनच जीएसडीपीच्या ३ टक्के कर्ज घेण्याची परवानगी होतीच. ती आता २ टक्के वाढवून ५ टक्के करण्यात आली आहे. परंतु त्या वाढीव २ टक्केपैकी ०.५ टक्के रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त १५-१६ हजार कोटी रक्कमच तातडीने मिळू शकेल. उर्वरित १.५ टक्के म्हणजेच सुमारे ४५ हजार कोटीरकमेची उचल करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आले आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे विविध घटकांना कर्ज रूपाने रक्कम देण्याची दाखवलेली तयारी आहे. त्यात अनेक शर्ती आहेत. त्या अटीशर्ती जो पूर्ण केल आणि ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ कोटी आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी या आर्थिक पॅकेजमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का व ते उत्सूक नसतील तर केंद्र किंवा राज्य सरकार त्यांना सक्ती करू शकत नाही. त्यामुळे पात्र नसलेल्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राच्या वतीने कर्ज किती आणि रोख खर्च किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी. केंद्र सरकारने अनेक अटी व शर्तींसह जाहीर केलेले ‘कर्जाधारित’ पॅकेज म्हणजे जणू काही राज्याच्या तिजोरीत रक्कम हस्तांतरित झाली आहे, असे भासवून जनतेची दिशाभूल करू नये, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

परबही करणार आज पोलखोलः मोदी सरकारच्या आर्थिक पॅकेजमधून महाराष्ट्राला मिळालेल्या आर्थिक मदतीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्याची आज शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पोलखोल करणार आहेत. आम्हालाच अर्थ आणि गणित कळते या भ्रमात कुणी राहू नये. सरकारमध्ये बसलेल्यांनाही अर्थशास्त्र कळते. सरकार कसे चालते आणि कसे चालवायचे हे आम्हालाही कळते. त्यामुळे मलाच काय ते कळते आणि महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, या भ्रमातून बाहेर पडा, असा टोलाही परब यांनी फडणवीसांना लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा