भाजपला घाबरणाऱ्या डरपोकांना पक्षाबाहेर हाकला, आम्हाला निडर लोकांची गरजः राहुल गांधी कडाडले

0
351
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्याने आक्रमकपणे टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आक्रमकपणे भूमिका मांडली. भाजपला घाबरणाऱ्या लोकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा, आपल्याला निडर लोकांची गरज आहे, डरपोक लोकांची नाही. तुम्हाला आरएसएसबद्दल सहानुभूती असेल तर चालते व्हा, मजा करा, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी परखडपणे विचार मांडले. अनेक निडर लोक आहेत, ते काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांना पक्षात आणले पाहिजे आणि भाजपला घाबरणाऱ्या लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. आरएसएसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांची आपल्याला गरज नाही. आपल्याला निडर लोक हवे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

असे अनेक लोक आहेत की जे घाबरत नाहीत. ते काँग्रेसच्या बाहेर आहेत. त्यांना आत आणा आणि जे आमच्या येथे घाबरत आहेत त्यांना बाहेर हाकला. चलो भैय्या जाओ. आरएसएस के हो, जाओ भागो, मजे लो. आम्हाला नको आहात. तुमची गरज नाही. आम्हाला निडर लोक हवे आहेत. हीच आमची आयडियालॉजी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे की सध्या काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाबाबतचे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पुढील सहा महिन्यांत उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या मोठ्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. कधी नवज्योतसिंग सिद्धू तर कधी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग दिल्ली दरबारात हजेरी लावत आहेत. राजस्थान काँग्रेसही गटबाजीने हैराण आहे. त्यातच असंतुष्ट नेत्यांचा जी-२३ समूहही आहे. या समूहातील नेते काँग्रेस सोडून जाण्याच्या किंवा ते वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा अधूनमधून होतच असतात. अशावेळी राहुल गांधी यांनी हा इशारा देऊन काँग्रेसमध्ये व्यक्ती नव्हे तर विचारसरणी महत्वाची असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा