‘अन्नदाता रस्त्यावर धरणे देत आहे आणि ‘झूठ’ टीव्हीवर भाषण!’

0
98
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर ठिय्या मारून बसलेल्या शेतकऱ्यांनी देशातील सर्व शेतकरी समूहांना बोलावल्याशिवाय चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे हे आंदोलन आणखीच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच यावरून आता राजकारणही तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचा अन्नदाता रस्त्यावर, मैदानावर उतरून धरणे देत आहे आणि ‘झूठ’ टीव्हीवर भाषण, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर टिकास्त्र सोडले असून अहंकाराच्या खुर्चीवरून खाली उतरून विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार द्या, असा सल्लाही राहुल यांनी दिला आहे.

 गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी काल वाराणसीत देवदिवाळीच्या कार्यक्रमात प्रकाशोत्सवाच्या झगमगाटाचा आनंद घेतला. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी गैरसमजाला बळी पडलेले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे, असे मोदी तेथे बोलताना म्हणाले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना मोदींनी प्रकाशोत्सवाच्या झगमगाटाचा आनंद लुटल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टिकास्त्रही सोडले होते.

हेही वाचाः शेतकऱ्यांच्या सर्व समूहांना बोलावल्याशिवाय चर्चा नाही, आंदोलकांनी पुन्हा धुडकावला केंद्राचा प्रस्ताव

आता याच मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींवर टिकास्त्र सोडले आहे. अन्नदाता रस्त्यावर, मैदानात धरणे देत आहे आणि ‘झूठ’ टीव्हीवर भाषण! शेतकऱ्यांच्या श्रमाचे आमच्या सर्वांवर कर्ज आहे. त्यांना न्याय आणि हक्क देऊनच या कर्जातून उतराई होता येईल, त्यांना दुषणे देऊन, काठ्याने बडवून किंवा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून नव्हे! जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार द्या, असे राहुल यांनी म्हटले आहे.

याआधीही काल राहुल गांधी यांनी देशातील शेतकरी काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात खंडीत आपले घर-शेती सोडून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. सत्य आणि असत्याच्या लढाईत तुम्ही कुणासोबत आहात? अन्नदाता शेतकरी की प्रधानमंत्र्यांचे भांडवलदार मित्र? असा सवाल राहुल गांधी यांनी देशवासियांना केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा