नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे आज पुन्हा दलित तरूणीवर सामूहिक बलात्कार झालेल्या हाथरसला भेट देण्यासाठी जाणार आहेत. हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून मला कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी गुरूवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यातच अडवले होते. पोलिसांनी राहुल गांधी यांची गचांडी पकडली होती, कॉलर पकडून त्यांना जमिनीवर खाली पाडले होते आणि कार्यकर्त्यांवर लाठीमारही केला होता. त्यामुळे देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टिकेची झोड उठली होती.
आता आज पुन्हा राहुल गांधी हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत. जगातील कोणतीही ताकद मला हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आणि त्यांचे दुःख समजून घेण्यापासून रोखू शकत नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी जो व्यवहार केला तो मला मान्य नाही आणि कोणत्याही भारतीयाला तो स्वीकारार्ह होणार नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी आज दुपारनंतर पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही असणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर झालेल्या गोंधळानंतर उत्तर प्रदेश सरकारने आज मीडियाच्या प्रतिनिधींना हाथरसमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे.