तुम्ही मोजले नाही म्हणजे मृत्यू झालेच नाहीत का?: स्थलांतरि मजुराच्या प्रश्नावर राहुल गांधींचे टिकास्त्र

0
25

नवी दिल्लीः  लॉकडाऊन काळात देशात किती स्थलांतरित मजुरांचे मृत्यू झाले? असा प्रश्न लोकसभेत मोदी सरकारला सोमवारी विचारण्यात आला होता. त्यावर याबाबत माहिती नाही, असे उत्तर सरकारकडून देण्यात आले होते. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले असून ‘तुम्ही मोजले नाहीत म्हणजे मृत्यू झालेच नाहीत का?,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या अधिवेशनात खासदारांनी मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यात लॉकडाऊनच्या काळात रोजगार गमवावा लागल्यामुळे घरी परतताना किती मजुरांचा मृत्यू झाला, असा एक प्रश्न होता. त्यावर आपल्याकडे स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूचा कुठलाही आकडा नाही, असे सरकारने मान्य केले. एवढेच नव्हे तर किती मजुरांचा रोजगार गेला, याबाबतही सरकारने कोणतेही सर्वेक्षण केले नसल्याचेही मान्य केले.

मोदी सरकारच्या याच भूमिकेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिकास्त्र सोडले आहे. ‘लॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरित मजूर मेले आणि किती नोकऱ्या गेल्या हे मोदी सरकारला माहीत नाही. तुम्ही मोजले नाही तर काय मृत्यू झाले नाहीत? परंतु सरकारवर परिणाम झाला नाही. त्यांचा मृत्यू जगाने पाहिला. एक मोदी सरकारच आहे, ज्याला खबरही लागली नाही,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा