महाराष्ट्राच्या हितावर असलेला कमळाचार्याचा तिरका डोळा फोडाः सावंतांचा भाजपवर घणाघात

0
32
संग्रहित छायाचित्र.

मुंबई मुंबईतील कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून महाविकास आघाडी सरकारची कोंडी करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्याची आहे. मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे, असा आरोप करतानाच ’भाजप म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा, असा घणाघात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

फडणवीस सरकारने मुंबई मेट्रोसाठी गोरेगाव येथील आरेच्या जंगलातील रातोरात प्रचंड झाडांची कत्तल केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने मुंबईच्या मध्यभागी असलेले आरेचे जंगल वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देत भाजपला दणका दिला होता. हा निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेचा संपूर्ण परिसर संरक्षित जंगल म्हणून घोषित केला आणि मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर हलवण्याचा निर्णय घेतला.

ज्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आणि हे काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण झाला आहे.  त्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून भाजपावर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांत भाजप व मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्याची आहे. १९८१ अगोदर पासून महाराष्ट्र शासन नाव लागलेले आहे. २०१५ मध्ये विभागीय आयुक्तांनी मीठागरे विभागाला ही जमीन दिली गेल्याचे कोणतेही पुरावे देता आले नाहीत, यामुळे त्यांचा दावा निकालात काढला होता. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. असे असताना ३ वर्षे या निर्णयाला सॉल्ट डिपार्टमेंटने न्यायालयात आव्हान दिले नाही. पण तीन वर्षांनंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मात्र लगेच त्यांना आठवण झाली. हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांमुळेच मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली आहे, असा आरोप करीत सावंत यांनी भाजपचा जाहीर निषेध केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा