कौशल दीपांकर / मुंबई
पूर्ण बहुमताचे सरकार स्थापनेचे स्वप्न घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजप- शिवसेना महायुती आपल्याच चक्रव्यूहात अडकलेली दिसू लागली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षात घेऊन ‘पूर्ण बहुमताचा जादूई आकडा’ गाठण्याचा ‘प्लान’च महायुतीचा ‘गेम’ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील 50 मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी काँग्रेस महाआघाडीच्या फायद्याची ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
2014 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढलेल्या आणि नंतर सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप- शिवसेनेने यावेळी विधानसभा निवडणुकीआधीच युती केली. युतीची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या अनेक दिग्गजांची मेगाभरती करून घेतली. त्यातील आयारामांना तिकिटे मिळाली. युती धर्मात हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे भाजप- शिवसेनेच्या अनेक इच्छूक निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते दुखावले आणि बंडाचे निशान उभारून ते महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंसह भाजप- शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी बंडखोरांना शमवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. मराठवाडा, मुंबई, पुणे, कोकण, नाशिक आणि विदर्भात अनेक मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवसेनेच्या विरोधात तर शिवसेनेचे बंडखोर भाजपच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. अशा मतदारसंघांची संख्या तब्बल 50 असून या बंडखोरीमुळे या मतदारसंघात भाजप- शिवसेना महायुतीला फटका आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बंडखोरीमुळे पाडापाडीचेच राजकारण जास्त रंगणार असल्याने काँग्रेस आघाडीला अच्छे दिन येतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
महायुतीला फटका आणि काँग्रेस आघाडीला फायदेशीर ठरू शकणारे काही महत्वाचे मतदारसंघ असे :
- वांद्रे पूर्व मतदारसंघात म्हणजे मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा पत्ता कट करून शिवसेनेने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे.
- फुलंब्री मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष व भाजप उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी बंडखोरी केली आहे. 2014 च्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे सांगत मते मागितली होती आणि मिन्नतवाऱ्या करून विजयी झाले होते.
- औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाठ यांच्या विरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी बंड पुकारले आहे. राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात भाजप- शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत. शिवसेनेचा विरोध डावलून भाजपने पक्षात घेतलेले आणि उमेदवारी दिलेले नितेश राणे यांच्या विरोधात कणकवली मतदारसंघात शिवसेनेचे सतीश सावंत यांनी आव्हान दिले आहे. सावंतवाडीत शिवसेनेचे उमेदवार आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपचे राजन तेली मैदानात आहेत. कुडाळमध्ये शिवसेनेचे उमेदवार, विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात भाजपचे रणजीत नाईक यांनी बंड पुकारले आहे.
- मुंबईच्या वर्सोवा मतदारसंघात विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी बंडखोरी केली आहे.
- अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात भाजपचे मुरजी पटेल मैदानात आहेत.
- घाटकोपर पूर्वमधून 1990 पासून सलग सहावेळा निवडूण आलेले माजीमंत्री, मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष प्रकाश मेहता यांचा पत्ता कापून भाजपने पराग शहा यांना उमेदवारी दिल्याने मेहता आणि भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
- रामटेकमध्ये भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल मैदानात आहेत.
- नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्या विरोधात भाजपचे दिलिप कंदकुर्ते यांनी बंडखोरी केली आहे. येथील आमदार हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार झाल्याने शिवसेनेने त्यांच्या पत्नीलाच मैदानात उतरवले आहे.
- कन्नडमध्ये शिवसेनेचे राजेंद्र राठोड यांच्याविरोधात भाजपच्या किशोर पवारांनी बंड पुकारले आहे. या मतविभाजनाचा फायदा हर्षवर्धन जाधवांनाच होण्याची शक्यता आहे.
- हदगावमध्ये शिवेसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात शिवसेनेचेच बाबुराव कदम पाथरडकर यांनी बंड पुकारले आहे. त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.