शिवसेनेसोबतची काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा अंतिम टप्प्यात, महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार

0
127
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः महाराष्ट्रात गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला. सायंकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत नव्या आघाडीचा किमान समान कार्यक्रम आणि सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी काँग्रेस नेते अश्विनीकुमार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. येत्या दोन- तीन दिवसांत सत्तास्थापनेच्या पेचावर  चर्चा करून राज्याला स्थिर सरकार देण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत झाला.

 महाराष्ट्रातील अस्थिरता लवकरच संपुष्टात येणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी दोन- तीन दिवस चर्चा सुरू राहील. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार देण्यात येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक हे उपस्थित होते, तर काँग्रेसकडून के.सी वेणुगोपाळ, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान इ. नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवास्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.

  सोनिया गांधींचा होकार मिळाल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तब्बल तीन तास चर्चा केली. गुरूवारीही दोन्ही काँग्रेसमधील चर्चा सुरूच राहणार आहे. अजूनही काही मुद्यांवर चर्चा होणे बाकी आहे. त्यामुळे ही चर्चा सुरूच राहील. त्यानंतर राज्याला लवकरच स्थिर सरकार देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. राज्यात स्थिर सरकार येईल आणि पर्यायी सरकार स्थापन होईल, अशी मला आशा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शिवसेनेसोबत बोलणी अंतिम टप्प्यात: पवार

तत्पूर्वी, शिवसेनेसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात असून येत्या दोन- तीन दिवसांत सरकार स्थापनेबाबतची चर्चा संपेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत किंवा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चाच झाली नाही, अशी गुगली टाकून पवारांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते.

 पेढ्यांची ऑर्डर गेली म्हणून समजाःराऊत

 महाराष्ट्रात लवकरच लोकनियुक्त आणि लोकप्रिय सरकार स्थापन होणार आहे. पेढ्यांची ऑर्डर गेली म्हणून समजा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच गोड बातमी देणार आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते अश्विनीकुमार यांच्या भेटीनंतर सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा