न्या. मुरलीधर यांची बदली हा भाजपच्या दबाव व सुडाच्या राजकारणाचा पर्दाफाशः काँग्रेसचा आरोप

0
111

नवी दिल्लीः दिल्लीतील हिंसाचाराच्या याचिकेची सुनावणी करणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या न्यायव्यवस्थेविरुद्ध दबाव आणि सुडाच्या राजकारणाचा पर्दाफाश झाल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि न्या. तलवंत सिंह यांनी दंगलीतील भाजप नेत्यांची भूमिका निश्चित करून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आणि संविधानानुरूप कारवाईचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले होते. जेव्हा न्यायमूर्तींना भाजपचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक भाषणांचे व्हिडीओ दाखवण्यात आले तेव्हा केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी यावेळी नामांकित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची योग्यवेळ नसल्याचा युक्तीवाद केला. न्या. मुरलीधर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्या व्हिडीओंच्या आधारे २४ तासांच्या आत भाजप नेत्यांविरुद्ध भादंविच्या कलमान्वये एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु भाजप नेत्यांना वाचवण्यासाठी न्याय मंत्रालयाने रातोरात न्या. मुरलीधर यांची बदली केली, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे.

संपूर्ण देश अवाक झाला आहे. परंतु मोदी-शाह सरकारला दुर्भावना, कुत्सिक विचार आणि निरंकुशतेने ग्रासले आहे. एक भक्कम आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था या देशाचा मूलाधार आहे. आपल्या देशाच्या इतिहासात न्यायव्यवस्थेने महत्वाच्या वेळी देशातील नागरिक आणि संविधानाचे रक्षण केले आहे. मात्र एखादे सरकार सत्तेच्या धुंदीत या देशाचे संविधान, न्यायव्यवस्था आणि नागरिकांचा विश्वास कमकुवत करत चालली आहे, असे देशात पहिल्यांदाच घडत आहे, असेही सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला यांनी मोदी आणि शाहांना काही प्रश्नही विचारल आहेत. ते असे-

  • भाजप नेत्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झाली तर दिल्लीतील हिंसाचार, दहशत, आणि अराजकतेत तुमच्या स्वतःची मिलीभगत होती, याचा भंडाफोड होईल,याची तुम्हाला भीती होती का?
  • निष्पक्ष आणि प्रभावी न्यायदान रोखण्यासाठी तुम्ही किती न्यायमूर्तींच्या बदल्या करणार आहात?
  •  तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिलेली विखारी विधाने उचित ठरवण्यासाठी तुमच्याकडे अन्य मार्ग नव्हता म्हणून  तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या न्यायमूर्तींची बदली केली का?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा