महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची काँग्रेसची तयारी, ठाकरे सरकारचे वाढले टेन्शन!

3
7088
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः काँग्रेसला पूर्णवेळ आणि लोकांमध्ये प्रभावी असलेला अध्यक्ष हवा, अशी मागणी करणारे पत्र देशातील काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी लिहिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाबाबत नव्याने चर्चा सुरू असतानाच राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची सूचना केली तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारचे टेन्शन वाढले असून या विधानाची राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

 काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस अंतर्गत राजकारणा ढवळून निघाले आहे. अध्यक्षपदी राहुल गांधींनीच रहावे, असे काँग्रेसमधील एका गटाला वाटते तर सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व असावे, असे दुसऱ्या गटाला वाटते. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांपैकी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस पक्ष चालवला जाऊ शकत नाही, याबाबत जवळपास सर्वच नेत्यांचे एकमत आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत राहुल गांधी यांचाही सहभाग होता. त्यांनी चर्चा करूनच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास होकार दिला होता. उद्या ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची सूचना केली तर आम्ही सत्ता सोडू, असे वडेट्टीवार म्हणाले. टीव्ही९ शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

माफी मागा, अन्यथा फिरू देणार नाहीः ज्या २३ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे, त्यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. त्यावरून दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी या नेत्यांना इशारा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून आदरणीय सोनिया गांधी यांना माझा मनःपूर्वक पाठिंबा आहे. गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या कृतीबद्दल या नेत्यांनी तत्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर काँग्रेस कार्यकर्ते या नेत्यांना राज्यात मुक्तपणे फिरू देणार नाहीत, असा इशारा केदार यांनी दिला आहे.

3 प्रतिक्रिया

  1. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे पण नाहीत ,
    म्हणून तर रसातळाला गेले
    अजुन पण सुधरत नाहीत

  2. महाराष्ट्राला सुगिचे दिवस आले आहेत अशा परिस्थितीत जर ठाकरे सरकार पाडल्याजाईल तर जनतेचा कोणत्याही राजकीय पक्षावर विश्र्वास नाही सद्ध्या महाराष्ट्र सरकार चांगली कामगिरी बजावत आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा