काँग्रेसची मोठी कारवाईः सचिन पायलटांना उपमुख्यमंत्रिपद,प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवले!

0
397
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/ जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावणारे सचिन पायलट यांच्याविरुद्ध काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच उपमुख्यमंत्रिपदावरूनही हटवण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिली. पायलट यांच्याबरोबरच विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीना यांनाही मंत्रिमंडळातून डिच्चू देण्यात आला आहे. गोविंद सिंग डोटासरा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 काँग्रेसने पायलट यांचे खंदे समर्थक आणि आमदार मुकेश भाकस यांनाही राजस्थानच्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले आहे. ‘काँग्रेसमध्ये निष्ठा म्हणजे अशोक गहलोत यांची गुलामी आणि ती आम्हाला मान्य नाही,’ असे ट्विट भाकर यांनी केले होते. भाकर हे लाडनूचे आमदार आहेत.

काँग्रेस नेतृत्वाने सचिन पायलट यांच्याशी दोनवेळा चर्चा केली. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेस कार्यसमितीच्या ज्येष्ठ सदस्यांनीही अनेकवेळा पायलट यांच्याशी चर्चा केली. पायलट आणि अन्य आमदारांना आम्ही तुमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत, असे आवाहन केले होते. मात्र ते भाजपच्या षडयंत्रात अडकून राजस्थानातील सरकार पाडण्याच्या कटात सहभागी झाले आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाऊच शकत नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

काँग्रेस नेतृत्वाने अत्यंत कमी वयाच्या सचिन पायलट यांना राजकीय ताकद दिली. २६ वर्षांचे असताना त्यांना खासदार केले. ३२ वर्षांचे असताना त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांना राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केले आणि वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री केले, असेही सुरजेवाला म्हणाले. काँग्रेसच्या या निर्णयावर सचिन पायलट यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. सत्य को परेशान किया जा सकता हे, पराजित नही, असे पायलट यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा