आधी पटोले म्हणालेः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची माझ्यावर पाळत, नंतर म्हणाले आरोप केंद्रावर!

0
116
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेस घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारवरच पाळत ठेवत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आणि नव्या वादाला तोंड फुटले. नंतर पटोले यांनी सारवासारव करत आपली राज्य सरकारबद्दल कोणतीच तक्रार नसून आपला आरोप केंद्र सरकारवर असल्याचे सांगितले.

लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारवरच गंभीर आरोप केले. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी असल्याचे मी सोनिया गांधींना सांगितले आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे, से आश्वासन मी त्यांना देऊन आलो आहे. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत भूमिका मांडली होती. मला काही ते सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असलो तरी मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे, असे पटोले म्हणाले.

आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता द्यावा लागतो. बैठका, आंदोलने कुठे सुरू आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचा सुद्धा रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माजी सभा पार पडली हे कोणाला माहीती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे. मी स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकायला लागी. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा ते प्रयत्न करणार, असे पटोले म्हणाले.

नव्या वादाला तोंड, राष्ट्रवादीकडून कानपिचक्याः नाना पटोले यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले. महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पटोलेंना टोलेबाजी करत भूमिका मांडली. पटोले यांनी माहिती अभावी हे आरोप केले आहेत. राज्यात सरकार कोणाचेही असो, राजकीय पक्षांच्या सभा, मोठ्या नेत्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलिस यंत्रणेला ठेवावी लागते. त्यासाठी असलेली विशेष शाखा गृहमंत्र्यांना माहिती देत असते. ही माहिती कुठल्याही पक्षाशी संबंधित असू शकते. कुणा एका पक्षाविषयी नसते. पटोलेंना हे माहीत नसेल तर त्यांनी सिस्टिम समजून घ्यावी. त्यांच्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली पाहिजे. पटोले यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या नेत्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना पोलिस सुरक्षा नको असेल तर तसे त्यांनी सांगावे. त्याबाबत गृहखाते निर्णय घेऊ शकते, असेही मलिक म्हणाले.

फडणवीस म्हणालेः पाळत का?:  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कापरे भरले आहे. त्यांना जेवणही जात नाही आणि ते पाणीही पित नाहीत. ते अत्यंत घाबरलेले आहेत. त्यामुळेच पटोले यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे. आता यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच बोलले पाहिजे. पटोलेंवर पाळत का ठेवण्यात येत आहे, हे सांगितले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नंतर पटोले म्हणालेः माझ्या वक्तव्याचा विपर्यास- वक्तव्यावरून वाद होताच नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. पाळत ठेवण्याबाबत माझा राज्य सरकारवर कोणताही आरोप नाही, असे पटोले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा