काँग्रेस पाच वर्षे पूर्ण ताकदीनिशी उद्धव ठाकरेंसोबतचः नाना पटोलेंचा सबुरीचा सूर

0
66
संग्रहित छायाचित्र.

पुणेः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा आणि मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता असतानाच आज पटोले यांनी थोडी सबुरीची भूमिका बोलून दाखवली. काँग्रेस पक्ष पाच वर्षे पूर्ण ताकदीनिशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेल. तसा शब्द खुद्द सोनिया गांधी यांनी दिला आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

पटोले यांनी स्वबळाची भाषा आणि मुख्यमंत्रिपदाच्या इच्छा व्यक्त केल्यापासून महाविकास आघाडीच्या स्थैर्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्हीही स्वबळाची भाषा करू शकतो, असा इशारा देत नाराजी व्यक्त केली होती. कोरोना संकटाच्या काळात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गंभीरपणे काम केले पाहिजे. अशा परिस्थितीत कुणी स्वबळाची भाषा करत असेल तर लोक जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ठाकरे म्हणाले होते.

 या पार्श्वभूमीवर कोथरूड येथे नगरसेवक चंद्रकांत कदम यांनी सुरू केलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्धघाटनानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी सावध भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हे काल मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलले आहेत. त्यांची एक ठाकरे शैली आहे, भाषा आहे. स्बळाची भाषा शिवसेनासुद्धा करते. त्यामुळे त्यांचा इशारा नेमका कोणाच्या दिशेने आहे, हे कळले पाहिजे, असे पटोले म्हणाले.

आधीचे सरकार पाच वर्षे चालले. पण त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालले. तरी ते सरकार चाललेच. हे सरकार निर्माण करताना आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी यांनी एकच भूमिका मांडली होती की, भाजपला रोखण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही, याची ग्वाही सोनिया गांधी यांनी दिली आहे, असेही पटोले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा