शेतकरी आंदोलनातील चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट

0
337
छायाचित्रः twitter/@KisanEktaMarch

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हिंसाचार घडवून आणण्याचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे. २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी निघणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार करण्याची योजना आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरियाणाच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी एका शूटरला पकडले. तेव्हा हा खुलासा झाला. या शूटरने पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.

कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारशी चर्चेची आकरावी फेरीही निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आता २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री सिंघू सीमेवर या शूटरला पकडले आणि चेहरा झाकून त्याला माध्यमासमोर हजर केले असता त्याने हा धक्कादायक दावा केला आहे.

२६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसह पुढे कुच करू लागतील, तेव्हा पहिल्या रांगेत जो आमचा माणूस असेल तो गोळ्या चालवेल. आम्हाला चार लोकांची छायाचित्रे देण्यात आली आहेत. हे चार लोक स्टेजवर असतील. त्यांना ठार मारण्याची योजना आहे, असे या चेहरा झाकलेल्या शूटरने पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्याने आम्हाला ही जबाबदारी दिली आहे, तो राय पोलिस ठाण्याचा पोलिस अधिकारी आहे. आमच्यासोबत आणखी लोक आहेत. ते पकडले गेलेले नाहीत. आमचे ६० लोक ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होतील. ते सर्व पोलिसांच्या वर्दीत असतील, असेही हा शूटर म्हणाला. पैश्यासाठी आम्ही हे काम स्वीकारले आहे. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी आमच्या टीममधील प्रत्येकाला १० रुपये देण्यात आल्याचेही त्याने सांगितले.

राय पोलिस ठाण्याचा हा अधिकारी जेव्हा आम्हाला भेटण्यासाठी यायचा तेव्हा त्याचा चेहरा झाकलेला असायचा. ज्या लोकांना गोळ्या घालून ठार मारायचे आहे, त्यांची नावे माहीत नाहीत, परंतु त्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले आहेत, असे सांगतानाच आमच्या दोन टीम आहेत आणि १९ जानेवारीपासून आम्ही सिंघू सीमेवरच आहोत, असा दावाही त्याने केला आहे. या शूटरचा दावा कितपत खरा आहे, याचा तपास हरियाणा पोलिस करत आहेत. त्याला चौकशीसाठी कुंडली पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

शेतकरी नेते जगजितसिंग दल्लेवाल यांनी सांगितले की, ही व्यक्ती आंदोलन स्थळाजवळ आंदोलक शेतकरी एका मुलीचे शोषण करत आहेत, असे सांगत आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पकडण्यात आले. आम्ही जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याने त्याला गोंधळ घालायचा आहे, अशी कबुली दिली आणि नंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा