चीनच्या कोरोना विषाणू संसर्गाचा इंदू मिलच्या आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाला फटका

0
330
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा दादरमधील इंदू मिल कंपाऊंडमध्ये होऊ घातलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीला फटका बसण्याची शक्यता आहे. इंदू मिल कंपाऊंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ४५० फुटी पुतळ्याचे काही महत्वाचे भाग चीनमधून आयात केले जाणार आहेत.

शापूर्जी पालोनजी या कंत्राटदारामार्फत इंदू मिल कंपाऊंडमध्ये ११०० कोटी रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत आहे. रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सोमवारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांची इंदू मिल कंपाऊंडमध्ये आढावा बैठक घेतली. त्यावेळी हे स्पष्ट झाले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे काही महत्वाचे भाग चीनमधून आयात केले जाणार आहेत. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. अशा स्थितीत स्थानिक अधिकारी या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आठवले यांनी सांगितले. २०२२ पर्यंत इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाची उभारणी पूर्ण करण्याची डेडलाइन असून या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश आठवले यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

महाकाय पुतळे उभारणीत चीनचा हातखंडा असून इंदू मिल स्मारकातील आंबेडकर पुतळ्याची पितळ, तांबे आणि अन्य धातूंपासून तयार केलेले बाह्य प्लेटिंग चीनमधून आयात केली जाणार आहे. गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा भरीव भागही चीनमधूनच आयात करण्यात आलेला आहे. चीनमध्ये पितळ आणि तांबे मुबलक प्रमाणात मिळते. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएला पुतळ्याच्या बाह्य प्लेटिंगसाठी पर्याय उपलब्ध झाला नाही तर आंबेडकर पुतळ्याच्या उभारणीस अनेक महिने विलंब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने इंदू मिल स्मारकातील आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवून ४५० फूट केली आहे. त्यामुळे वाऱ्याच्या प्रभावाचे विश्लेषण करून त्यानुसार पुतळ्याच्या आराखड्यात आवश्यक ते बदल करावे लागतील, असे एमएमआरडीएच्या सूत्रांनी सांगितले. नव्या निर्णयानुसार स्मारकातील आंबेडकर पुतळ्याची उंची ४५० फूट आणि चबुतरा १०० फूट उंचीचा असणार आहे. गेल्या दोन वर्षांत या स्मारकाच्या उभारणीचा खर्च ७०९ कोटी रुपयांवरून ११०० कोटी रुपयांवर गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर २०१५ मध्ये या स्मारकाची कोनशीला बसवण्यात आली होती. मात्र कामात कोणतीही प्रगती झाली नव्हती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा