राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याच्या वादात खा. सुप्रिया सुळे यांची उडी, म्हणाल्या…

0
435
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’ असे विधान करून कोश्यारी यांनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०१८ मध्ये दिलेल्या निकालाची प्रत शेअर करत शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

औरंगाबादेत रविवारी समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’ असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे कोश्यारी यांच्यावर महाराष्ट्रभरातून टिकेची झोड उठली असून त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही केली जात आहे.

हेही वाचाः Video: समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?, राज्यपाल कोश्यारींचे औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य

या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली असून त्यांनी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाची प्रतच ट्विटवर शेअर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार ‘तपास अधिकाऱ्यंनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही,’ असे खा. सुळे यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरूशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असेही खा. सुळे यांनी म्हटले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खा. सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक व्हिडीओ क्लिपही शेअर केली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण हे आदरणीय रवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात, जे लोक सांगतात की रामदार शिवाजी महाराजांचे गुरू होते, ते खोटे आहे…रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, शिवाजी महाराजांचे गुरू राजमाता जिजामाता होत्या, असे शरद पवार यांनी म्हटले आहे, असे खा. सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते… राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा व्हिडीओ व्हायरल

शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले हे जिजामातेच्या संस्कारांनी… त्यामुळे शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती. त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडवले अशी लेखणीची कमालकृत्ये केली आणि आम्ही जे लोक मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासामुळे आहे, हे खरे नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्व या देशामध्ये आले, असेही या व्हिडीओत पवार यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा