राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्षाची पुन्हा ठिणगी, कोश्यारी उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर!

0
228
संग्रहित छायाचित्र.

मुंबई/औरंगाबादः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या म्हणजेच ५ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत असून राज्य सरकारने पूर्ण केलेल्या कामांची परस्पर उद्घाटने त्यांच्या हस्ते होणार आहेत. शिवाय ते राज्य सरकारच्या परस्पर तीन जिल्ह्यांच्या आढावा बैठकाही घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष नव्याने पहायला मिळणार आहे.

 राज्यपाल कोश्यारी हे उद्या, ५ ऑगस्ट रोजी नांदेड येथे येणार आहेत. नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुले आणि मुलांच्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर राज्यपाल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

नांदेडचा कार्यक्रम आणि बैठका आटोपून राज्यपाल कोश्यारी हे शुक्रवारी ६ ऑगस्टला हिंगोलीला जाणार आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली ही विद्यापीठे येतात. मात्र हिंगोलीत कुठलेही विद्यापीठ नाही किंवा विद्यापीठाचे उपकेंद्रही नाही. तरीही राज्यपाल हिंगोलीत येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

शनिवारी, ७ ऑगस्टला राज्यपाल कोश्यारी परभणी कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमानंतर कोश्यारी परभणीतही जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. राज्यपालांच्या या दौऱ्यावरून महाविकास आघाडी सरकारने उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या या दौऱ्यावरच जाहीर आक्षेप घेतला आहे. नांदेडमध्ये अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या दोन वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी ही वसतिगृहे अद्याप विद्यापीठाकडे सोपवलेली नाहीत. या वसतिगृहांचे उद्घाटन करून ती विद्यापीठाकडे सोपवण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. या उद्घाटनाला राज्यपालांना बोलवायचे की नाही, हा अधिकार विद्यापीठ प्रशासनाचा आहे. मात्र अल्पसंख्याक विभागाला न विचारताच राज्य सरकारने केलेल्या कामाचे परस्पर उद्घाटन उद्घाटन करणे योग्य नाही, असा आक्षेप मलिक यांनी घेतला आहे.

 हिंगोलीत कुठलेही विद्यापीठ नाही. असे असताना तेथे जाऊन राज्यपाल आढावा बैठक घेत आहेत, यावरही मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यपालांचा मराठवाडा दौरा हा राज्य सरकारचे आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांचे अधिकार स्वतःकडे घेण्याचाच राज्यपालांचा प्रयत्न आहे, अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे. कोश्यारी यांना आपण राज्यपाल असल्याचा विसर पडलाय की काय? ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांना कळले पाहिजे, असेही मलिक म्हणाले.

 मंत्रिमंडळाचीही तीव्र नाराजीः विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांच्या मुद्यांवरून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला राज्यपालांचा मराठवाडा दौरा हा नवीन अध्याय मानला जात आहे. राज्यपालांच्या या दौऱ्याचे पडसाद काल मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ता केंद्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

नाराजी कळवूनही राज्यपाल दौऱ्यावर ठामः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या दौऱ्यावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी थेट राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांची भेट घेऊन राज्यपालांच्या दौऱ्यावर राज्य सरकारची नाराजी कळवली होती. मात्र त्यानंतरही राज्यपाल मराठवाडा दौऱ्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार असा वाद पुन्हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

 सरकारची अडवणूक करण्याचा प्रयत्न कराल तर…. राज्यपालांनी सरकारची अडवणूक करू नये. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार आहे. राजभवन हे राज्य सरकारला मदत करण्यासाठी असते, पाय खेचण्यासाठी नसते. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राज्यपालांना कोणी हस्तक्षेप करण्यास भाग पाडत आहे का, हे पहावे लागले, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा