मनसेच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा वापरल्याने नवे वादंग; मराठा संघटना, शिवप्रेमींकडून विरोध

0
250
छायाचित्र सौजन्यः मनसे

मुंबईः राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मुंबईत सुरू असलेल्या महाअधिवेशनात पक्षाचा जुना झेंडा बदलून नवीन झेंडा हाती घेण्यात आला आहे. मनसेने हाती घेतलेल्या नव्या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा वापरण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून मराठा संघटना आणि शिवप्रेमींनी राजकारणासाठी राजमुद्रेचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे.

राजकीय अस्तिवात्वाच्या शोधात असलेल्या मनसेने पूर्णतः मेकओव्हर करण्याच्या उद्देशानेच मुंबईत महाअधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजमुद्रेचा वापर करणे गैरकृत्य आहे. एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका एखाद्या घटकाला पटली नाही की त्या राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलने होतात. झेंड्याची जाळपोळ होते. निवडणुकीच्या काळात लावलेले झेंडे निवडणूक  अधिकारी उतरवून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकतात. शिवरायांची राजमुद्रेचा डम्पिंग ग्रांऊड किंवा आंदोलनात अवमान होत असताना शिवप्रेमी पाहूच शकत नाहीत, त्यामुळे राजमुद्रेचा समावेश राष्ट्रीय सन्मान प्रतिके अवमान प्रतिबंधक कायद्यात समावेश करावा, अशी मागणी मराठा संघटनेचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राजमुद्रा असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याला मान्यता देऊ नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.  राजमुद्रेचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्यास आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडनेही दिला आहे.

दरम्यान, मनसेच्या नव्या झेंड्याला नेटकऱ्यांकडूनही जोरदार विरोध होत आहे. मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा तत्काळ हटवण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा