भाजप आमदार पडळकरांच्या वक्तव्यावरून वाद, तोंड काळे करून चोप देण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

0
551

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला असून पडळकरांनी केलेले विधान चूक असून भाजपशी त्याचा काहीही संबंध नाही, असे सांगत भाजपने या वादातून अंग काढून घेतले आहे. तर पडळकर माफी मागत नाहीत, तोवर ते जातील तेथे आंदोलन करू, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. तर पडळकरांचे तोंड काळे करून चोप देऊ, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.

पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार पडळकर यांची जिभ घसरली. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. छोट्या समूहाला भडकवायचे आणि लढवायचे हेच धोरण त्यांनी राबवले आहे. पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी अत्यंत खालच्या पातळीवरची टीका पडळकरांनी केली.

 त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. गोपीचंद पडळकर यांचे तोंड काळे करून चोप देणार, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नितीन देशमुख यांनी दिला आहे. पडळकरांनी आपली वक्तव्ये सांभाळून करावी, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

 राजकारणात विरोध असावा. मात्र वैयक्तिक टीका कोणत्या पातळीवर करावी, याला मर्यादा असतात. पडळकरांनी राजकीय सभ्यता शिकून घ्यावी, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

पडळकर फडणवीसांचे विश्वासूः पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे गोपीचंद पडळकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यांच्यामुळेच ते आमदारही झाले आहेत. त्यामुळे पडळकरांनी केलेली टीका फडणवीसांना मान्य आहे का? नसेल तर फडणवीस गप्प का?  असा सवाल सोशल मीडियावर अनेकांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा