महाविद्यालये, विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये; सप्टेंबरपासून नवे सत्रः यूजीसी समितीची शिफारस

3
14664
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा महाविद्यालये आणि विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीच्या एका समितीनेच तशी शिफारस केली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे होऊ न शकलेल्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याची शिफारसही या समितीने केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शाळा- महिविद्यालये बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे शाळा-महाविद्यालये १६ मार्चपासूनच बंद आहेत. तेव्हापासून बंद झालेली महाविद्यालये आणि विद्यापीठे अद्याप उघडलेली नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण आहे आणि परीक्षाही व्हायच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि नव्या शैक्षणिक सत्राबाबत सूचना करण्यासाठी यूजीसीने एक समिती स्थापन केली होती. या समितीने सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ करण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच जवळपास दोन महिने विलंबाने यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या होऊ न शकलेल्या वार्षिक आणि सेमिस्टरच्या शेवटी होणाऱ्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात, अशी शिफारसही या समितीने केली आहे. हरियाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या शिफारशींच्या आधारावरच आता यूजीसी विद्यापीठांच्या परीक्षा आणि अकॅडमिक कॅलेंडरसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित करून त्या देशभरातील विद्यापीठांना जारी करेल.

ऑनलाइन परीक्षा अशक्यः भारतामध्ये सध्या तरी ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य आहे. कारण बहुतांश विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडे तशा पायाभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्या विद्यापीठांकडे सुविधा आहेत, ती विद्यापीठे ऑनलाइन परीक्षा घेऊ शकतात आणि ज्यांच्याकडे सुविधा नाहीत, अशा विद्यापीठांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत लेखी परीक्षेसाठी प्रतीक्षा करावी किंवा विद्या परिषदेत प्रस्ताव मांडून स्नातक आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावर बढती देण्यात यावी, असेही समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना बंधनकारक नव्हे, सल्ला स्वरूपाच्याः
“परीक्षा आणि शैक्षणिक सत्राच्या मुद्यावर यूजीसीकडून जारी होणाऱ्या मार्गदर्शक सूचना अनिवार्य नसतील. केवळ सूचनांच्या स्वरूपाच्या असतील. प्रत्येक राज्यातील परिस्थिती आणि कोरोना संसर्गाचा दरही भिन्न आहे. काही विद्यापीठे लहान आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा पुरवू शकतात. तर काही विद्यापीठांत हजारो विद्यार्थी आणि मर्यादित पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांसाठी एकच आदर्श  सूचना बंधनकारक करू शकत नाही. मार्गदर्शक सूचनांमध्ये लवचिकता असेल.”
रजनीश जैन, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव

3 प्रतिक्रिया

  1. परीक्षा रद्द कराव्यात….
    कारण corona मुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे …..
    विद्यार्थांना आजवर माहिती नाही की परीक्षा होणार की नाही ते ….. त्यामुळे विद्याथ्र्यांची मनस्थिती कोड्यात पडलेली आहे…..
    सर्वांना उत्तीर्ण करून मागील सत्रावर आधारित गुणपट (मेरीट) द्यावा…..
    आणि लगेच द्वितीय सत्रास सुरुवात करावी…..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा