भारतात कोरोनाचे ८ नवे रूग्ण, बाधितांची संख्या ३९

0
103
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारतात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले ८ नवीन रूग्ण सापडले असून कोरोना बाधितांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. कोरोना बाधितांमध्ये इटलीहून आलेल्या १६ जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून कोरोनाबाबत लोकांमध्ये सासत्याने जागरूकता निर्माण करावी, असे निर्देश सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत. जगभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. कोरोना संसर्गामुळे न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

जगातील ९४ देशात कोराना विषाणुचा फैलाव झाला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणुने ३,५१५ लोकांचे बळी घेतले आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोना बाधितांची संख्या ८९ वर पोहोचली असून न्यूयॉर्कमध्ये आणिबाणी जाहीर करण्यात आली हे. इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांना शक्य तितक्या लवकर तेथून बाहेर काढावेत असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. इराणमध्ये कोरोना संसर्गामुळे आजपर्यंत १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना झपाट्याने होत असलेला फैलाव पाहता मोदींनी होळीचा कार्यक्रम रद्द केला आहे. भारतात आजवर ६ लाख लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.

भारतात नव्याने सापडलेल्या कोराना बाधितांमध्ये दोन जण लडाखचे आणि एक जण तामिळनाडूचा आहे. लडाखमधील हे बाधित इराणहून तर तामिळनाडूतील बाधित ओमानहून आलेला होता. या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय केरळमध्ये आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीशिवाय जम्मू काश्मीर आणि श्रीनगरच्या अनेक जिल्ह्यांतील प्राथमिक शाळांना सुटी देण्यात आली  आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाचणीसाठी देशात ५२ प्रयोगशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. लोकांनी खोकलताना आणि शिंकरताना रूमाल किंवा टिश्यू पेपरने तोंड झाकावे आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा