कोरोना लस घेतल्यानंतर ५२ जणांना त्रास

0
1129
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाची लस दिल्यानंतर दिल्लीतील ५२ जणांना त्रास झाला. त्यापैकी एकाच जणाला जाणवत असलेला त्रास गंभीर आहे, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे.

शनिवारी देशभरात कोरोना लसीकणाला प्रारंभ झाला. दिल्लीत कोरोनाची लस देण्यात आल्यानंतर दक्षिण दिल्लीतील ११, पूर्व दिल्लीतील ६, मध्य दिल्लीतील २, नवी दिल्लीतील ५ दक्षिण-पश्चिम दिल्लीतील ११, पश्चिम दिल्लीतील ६ जणांना किरकोळ स्वरुपाचा त्रास जाणवला. त्यापैकी दक्षिण दिल्लीतील एका जणाला जाणवत असलेला त्रास गंभीर स्वरूपाचा आहे.

ठरल्याप्रमाणे दिल्लीत लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १ हजार ११७ जणांना ८१ लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस देण्यात येणार होती. प्रत्यक्षात ४ हजार ३१९ जणांचेच लसीकरण करण्यात आले आहे, असे दिल्ली सरकारने म्हटले आहे.

हेही वाचाः डिजिटल इंडियाचा पचकाः महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण दोन दिवस स्थगीत

नवी दिल्ली महानगरपालिकेच्या चरक पालिका रुग्णालयात लसीकरण करण्यात आलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरुपाचा त्रास झाला, असे नवी दिल्ली महानगरपालिकेने म्हटले आहे. हे दोन्ही आरोग्य कर्मचारी महिला असून त्या महापालिकेच्या रुग्णालयातच पॅरामेडिकल कर्मचारी आहेत, असे नवी दिल्ली महानगरपालिकेने म्हटले आहे.

शनिवारच्या लसीकरणात देशभरात १ लाख ९१ हजार १८१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर कोणालाही देशभरात रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. १६ हजार ७५५ कर्मचाऱ्यांनी लसीकरणाच्या मोहिमेत भाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा