प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

0
57
छायाचित्र सौजन्यः twitter/@narendramodi

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. दिल्लीच्या एम्समध्ये जाऊन हा डोस घेतल्याची माहिती मोदींनीच ट्विट करून दिली. विशेष म्हणजे मोदी यांनी भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सीन ही लस घेतली आहे.

लस घेताना मोदींच्या गळ्यात गमुसा हे आसामी उपरणे होते. हे उपरणे देशातील विविध भागात लोकप्रिय आहे. मोदींना लस टोचणारी परिचारिका पुद्दुचेरीची आहे. त्यांचे नाव पी. निवेदा असे असून दुसरी परिचारिका केरळमधील आहे. त्यांचे नाव रोसम्मा अनिल असे आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई बळकट करण्यामध्ये आपले शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे योगदान उल्लेखनीय आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही मोदी यांनी केले आहे. आपण सगळे मिळून भारत कोरोनामुक्त करूया, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

प्रोटोकॉलचे पालनः लस घेण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी कोरोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन केले. लस देण्यापूर्वी त्यांना आवश्यक ती माहिती देण्यात आली. त्यांनी नोंदणी फॉर्मही भरला. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर त्यांना अर्धातास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यांच्यात कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवले नाहीत. त्यानंतर ते परत गेले. मोदींनी स्वतः लस घेऊन स्वदेशी लस सुरक्षित असल्याचा संदेश दिला आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

लसीकरणातही निवडणुकीवर डोळाः केरळ, तामीळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज मोदी लस घेतानाही निवडणुकीवर डोळा असल्याचेच दिसून आले. निवडणूक होत असलेल्या राज्यांपैकी त्यांना लस देणाऱ्या परिचारिका पुद्दुचेरी आणि केरळच्या होत्या. त्यांनी गळ्यात घातलेले उपरणे आसामी होते आणि त्यांची वेशभूषा पश्चिम बंगाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा