मोदींसह सर्व राज्याचे मुख्यमंत्री, आमदार-खासदार घेणार कोरोनाची लस

0
98
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरू झाले मात्र या लसीकरण मोहिमेला अद्याप म्हणावी तशी गती आलेली नाही. आता लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आमदार-खासदारांनाही कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिकेत कोरोना लसीकरण सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टीव्हीच्या कॅमेरासमोर लाइव्ह लस घेतली होती. अमेरिकी नागरिकांच्या मनातील लसीविषयीची भीती निघून जावी म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले होते. त्याच धर्तीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर लाइव्ह लस घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.

देशात कोरोना लसीकरण सुरू झाले परंतु प्रधानमंत्र्यांसह राजकीय नेते लसीकरणात सहभागी का झाले नाहीत, असा सवालही वारंवार विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे.

कोरोनाच्या लसीबाबत देशातील नागरिकांच्या मनात असलेली भीती आणि भ्रम दूर करण्यासाठी प्रधानमंत्र्यांसह देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीकरणात ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या आमदार-खासदारांनाही लस दिली जाणार आहे.

दुसरा टप्प्या नेमका कधी?: कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवा कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र या लसीकरण मोहिमेला अजूनही म्हणावी तशी गती आलेली नाही. एका केंद्रावर दररोज १०० जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, प्रत्यक्षात लसीकरणाचा मेसेज पाठवूनही अनेक जण लसीकरणासाठी येतच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पहिला टप्पा कधी पूर्ण होईल आणि दुसरा टप्पा कधी सुरू होईल, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा