पीएम केअर फंडातून देशातील १०० रुग्णालयांत ऑक्सीजन प्लांट उभारणा, केंद्र सरकारचा निर्णय

0
64

नवी दिल्लीः देशातील कोरोनाचे संकट आक्राळविक्राळ रुप धारण करत असल्यामुळे केंद्र सरकार आता खडबडून जागे झाले असून पीएम केअर फंडातून देशातील १०० कोविड रुग्णालयात स्वतःचे ऑक्सीजन प्लांट उभारण्याचा निर्णय सरकारने आज गुरूवारी घेतला आहे. देशातील ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेता केंद्र सरकारने ५० हजार मेट्रीक टन ऑक्सीजनही आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ईजी-२ म्हणजे अधिकारप्राप्त समूहाची महत्वाची बैठक आज झाली. या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सीजनच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. पीएम केअर फंडातून मंजुरी देण्यात आलेल्या १६२ प्रेशर स्वींग ऍडसॉर्प्शन प्लांटच्या (पीएसए) कामाच्या प्रगतीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला आहे.

याच बैठकीत देशात पीएम केअर फंडातून देशातील १०० रुग्णालयात स्वतःचे ऑक्सीजन प्लांट उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला., अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलायने या बैठकीनंतर दिली.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील बारा राज्यांत ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. महाराष्ट्राची ऑक्सीजनची मागणी तर उपलब्ध राज्यात उत्पादन होणाऱ्या ऑक्सीजनच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात तर ऑक्सीजन निर्मितीचा एकही प्लांट नाही. गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासारख्या ऑक्सीजनची निर्मिती करणाऱ्या राज्यातही ऑक्सीजनची मागणी वाढू लागली आहे.

 या राज्यांतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सीजनची वाढती मागणी लक्षात घेऊन पुढील काही आठवड्यांत ऑक्सीजन पुरवठा कसा सुरळीत करण्यात येईल, यावरही या बैठकीत विचारविनियम झाला.

 या १२ राज्यांना २० एप्रिल, २५ एप्रिल आणि ३० एप्रिलपर्यंत ४,८८० मेट्रिक टन, ५,६१९ मेट्रिक टन आणि ६, ५९३ मेट्रिक टन ऑक्सीजन लागू शकते, असा अंदाज या बैठकीत बांधण्यात आला. नवीन ऑक्सीजन प्लांट उभारावयाची १०० रुग्णालये निश्चित करण्याचे निर्देश या गटाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा