नागपूरः कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे नागपूर शहरात १५ ते २१ मार्च असे सात दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.
लॉकडाऊनच्या काळात कडक संचारबंदी ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या काळात खासगी कार्यालये बंद ठेवण्यात येणार असून सरकारी कार्यालयात केवळ २५ टक्केच उपस्थिती राहील. आर्थिक व्यवहारविषयक तसेच लेखा आणि मार्च एडिंगशी संबंधित कार्यालये मात्र पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, असे राऊत म्हणाले.
सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील. परंतु ऑनलाइन मद्यविक्री सुरू राहील. खाद्यपदार्थांची घरपोच सेवाही सुरू राहील. लॉकडाऊन काळात सूट असलेल्या सेवेतील कर्मचाऱ्यांना सोबत ओळखपत्र ठेवावे लागेल.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. भाजीपाला, फळे,मांस, मासे, अंडी विक्रीही सुरू राहील. घरी विलगीकरणात असलेले नागरिक पूर्णवेळ घरीच आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रशासनातर्फे अचानक भेटी दिल्या जाणार असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.