कोरोनाचे रौद्ररूपः राज्यात आज ५७ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण, २२२ जणांचा मृत्यू

0
67

मुंबईः राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रचंड वेगाने फैलावत चालला असून या संसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५७ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आज आढळलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता राज्यात हे संकट अधिक गडद होत चालल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.

 राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने उद्या सोमवारपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडकडित लॉकडाऊनही लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत ५७ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. एखट्या मुंबई महापालिका क्षेत्रात ११ हजारांवर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे आणि नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत गेल्या २४ तासांत ६ हजार ३२१ तर नागपूर महापालिका हद्दीत ३ हजार १११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 राज्यात सध्या ४ लाख ३० हजार ५०३ सक्रीय रूग्ण आहेत. सक्रीय रुग्णसंख्येच्या बाबतीत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ८१ हजार ३१७ सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबई महापालिका क्षेत्रात ६६ हजार ८०३ सक्रीय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात ५३ हजार ६३८ तर ठाणे जिल्ह्यात ५३ हजार २३० सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 राज्यात आतापर्यंत २ कोटी ५ लाख ४० हजार १११ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ३० लाख १० हजार ५९७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर १९ हजार ७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २७ हजार ५०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत २५ लाख २२ हजार ८२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्के एवढे आहे तर मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा